लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे हरवलेल्या मुलाला पाच वर्षांनी शोधल्याचा आनंद ठाणे शहर पोलिसांना झाला असता, दुसरीकडे हीच गोड बातमी त्या मुलाच्या पालकांना देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ते कुटुंब लॉकडाऊनमध्ये अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे शोधलेल्या मुलाच्या क्षणभराचा आनंदावर विरजण पडते की काय, असे वाटत होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने, पाच वर्षांपूर्वी हरवलेल्या गतिमंद अकबरची आणि कुटुंबाची ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने भेट घडवून आणली. १७ वर्षांचा असताना हरवलेला अकबर आता २२ वर्षांचा झाल्यावर सुखरूप मिळाल्याचा आनंद त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर भेटीच्या वेळी दिसून आला.चाइल्ड प्रोटेक्शन युनिट हे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे आणि चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या प्रभारी अधिकारी शीतल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुलांचा शोध घेत आहेत. त्यातच पाच वर्षांपूर्वी १३ ऑगस्ट, २०१५ ला नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात १७ वर्षीय गतिमंद मुलाचा तपास करताना घेऊनही तो मिळून येत नसल्याने, ठाणे बालकल्याण समिती कार्यालयामार्फत महाराष्ट्रातील गतिमंद मुलांची संस्थेत पुन्हा माहिती घेऊन त्याचा शोध सुरू झाला.
धुळे येथील शिरपूरच्या अनात्गमतिमंद मुलाची बहुउद्देशीय संस्थेत फोटोद्वारे खात्री करताना, बालगृहात अकबरसारखा मिळता-जुळता मुलगा सापडल्याने पोलिसांनी तातडीने ती बाब फिर्यादींना देण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली असता, ते लॉकडाऊनच्या काळात घर सोडून गावी गेल्याचे समजले. म्हणून एफआयआरमध्ये दिलेल्या गावाच्या पत्त्यावर संत कबीरनगर पोलीस स्टेशन उत्तर प्रदेश या ठिकाणी चौकशी केली. मात्र, ते तेथेही गेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पोलिसांनी अखेरचा पर्याय म्हणून ठाणे, कल्याण, मुंबई या भागात उत्तर भारतीय राहत असलेल्या भागात जाऊन त्यांच्याबाबत चौकशी केली, तेथे ही ते मिळून न आल्याने तेही प्रयत्न पोलिसांचे अयशस्वी ठरले. त्यातच २८ डिसेंबर, २०२० रोजी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके यांना फोन आला. साहेब ‘मुलगा मिळाला का’ यावेळी पोलिसांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्यावर मुलाचा फोटो पाठविल्यावर फिर्यादी यांनी फोटोतील मुलगा अकबर असल्याचे ओळखले. त्यानंतर, पितापुत्राची भेट झाली आणि पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचे अखेर चीज झाल्याचे पाहण्यास मिळाले.
पाच वर्षे शोध घेऊनही तो मुलगा मिळत नव्हता. जेव्हा त्याच्या चेहऱ्यासारखा मिळताजुळता मुलगा मिळाल्यावर त्याची माहिती कुटुंबाला देण्यासाठी गेल्यावर ते कुटुंब लॉकडाऊनमुळे तेथून स्थलांतरित झाल्याचे समोर आले. त्यानंतर, त्यांचाही शोध घेऊन ते सापडले नाही. दरम्यान, फिर्यादींचा फोन आल्यावर त्यांची खातरजमा करून मुलाची आणि कुटुंबाची भेट घडवून आणली.- शीतल मदने, प्रभारी अधिकारी, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, ठाणे