ठाणे : नाशिकमधील आश्रमशाळेत शिकणारा सातवर्षीय आदित्य त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह मुंबई फिरण्यासाठी आल्यावर ठाण्यात हरवला होता. तो स्टेशन परिसरात घुटमळत असल्याचे पाहून एका विक्रेत्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला २४ तासात आईच्या हवाली केले.
गोरेगाव येथे राहणारा आदित्य तीन महिन्यांपासून नाशिक येथील पाटोळे आश्रमशाळेत शिकत आहे. या शाळेतील एका सहकाºयासोबत तो रविवारी मुंबई फिरण्यासाठी आला होता. सोमवारी ते ठाण्यात आले. त्या दोघांची स्टेशन परिसरात फिरताना चुकामूक झाली. त्या दिवशी रात्री १ वाजले तरी, तो एकटाच फिरत असल्याचे पाहून एका विक्रेत्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला ठाण्यात आणून विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपले पूर्ण नाव सांगितले. तसेच आई गोरेगाव, तर वडील गावाला राहतात, असे सांगितले. तो नाशिक येथील पाटोळे आश्रमशाळेत शिकत असल्याचे सांगितले. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर व एस.एस. साबळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कुलकर्णी, पोलीस नाईक घारगे, छापानीमोहन यांनी प्रसारमाध्यमांची मदत घेऊन मुंबईच्या गोरेगावसह नाशिकची पाटोळे शाळा शोधून तिचा फोटो दाखवल्यावर तो तेथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, तेथील स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. तसेच एक पथक तेथे रवानाही झाले. याचदरम्यान त्याची आई गोरेगाव येथून पोलीस ठाण्यात आली आणि मायलेकांची पुनश्च भेट झाल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.