मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीचा कार्यक्रम असताना पक्षाच्या नावे निमंत्रण पत्रिका छापल्या. पालिकेचे बोधचिन्ह टाकून गिफ्ट कूपन पक्षाच्या माध्यमातून वाटण्याच्या भाजपाच्या प्रकाराबद्दल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सेनेने केली. पालिकेच्या कार्यक्रमास पक्षीय स्वरुप आल्याने महिला दिनाचा कार्यक्रम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. समितीच्या सभापतीपदी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता तर उपसभापतीपदी शिवेनेसेनेच्या शुभांगी कोटियन आहेत. आठ सदस्यांच्या या समिती ाध्ये केवळ भाजपा, सेना व बविआच्या सदस्य असून दोन्ही काँग्रेसने नाव न दिल्याने त्यांचे सदस्य नाहीत. बुधवारी मॅक्सस मॉलसमोरील भगतसिंह मैदानात महिला दिनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदाच मैदानात कार्यक्रम ठेवत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली. मात्र बॅनरवरुन खासदार राजन विचारे यांना वगळले आहे. शिवाय समितीच्या सहा महिला नगरसेविकांचे छायाचित्र बैठकीत ठरले असतानाही टाकलेले नाही. पालिकेचा कार्यक्रम असताना भाजपाने स्वत:ची निमंत्रण पत्रिका छापली असल्याचे उघड झाले आहे. कहर म्हणजे पालिकेचा लोगो असलेली प्रत्येकी शंभर गिफ्ट कूपन भाजपाच्या महिला नगरसेविका, पदाधिकाऱ्यांना दिली आहेत. एका खाजगी प्रायोजकाच्यामार्फत भाजपाकडून कूपन मिळालेल्या महिलांना पर्सचे वाटप केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व गोष्टींची कुणकूण लागताच उपमहापौर प्रवीण पाटील, स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे, गटनेत्या नीलम ढवण, उपसभापती शुभांगी कोटियन सह नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, जयंतीलाल पाटील, जयमाला पाटील, वैशाली खराडे यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेतली. या प्रकारा बद्दल निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली.कार्यक्रमात पालिकेच्या खर्चातून प्रत्येक नगरसेविकेला इलेक्ट्रीक शेगडी तर पालिका शिक्षिका, महिला कर्मचाऱ्यांना कूकर भेट म्हणून दिला जाणार आहे. शिवाय ‘बेटी बचाव’ वर जनजागृतीसह यशस्वी महिलांचा सन्मान, नृत्य सादर होणार आहे. (प्रतिनिधी)भाजपाच्या निमंत्रण पत्रिका व गिफ्ट कूपनची तक्रार आली असून त्याच्याशी महापालिकेचा काहीही सबंध नाही. - डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त. महिलांचा सन्मान, जनजागृतीपर कार्यक्रम असून महिलांना गिफ्ट कूपन वाटण्यात आली आहेत. - डिंपल मेहता, सभापती, महिला बालकल्याण समिती. पालिकेच्या महिलांच्या कार्यक्रमात असे गलिच्छ राजकारण खपवून घेणार नाही. महिलांमध्ये भेटवस्तू वाटपाचा भेदभाव चुकीचा आहे. - प्रवीण पाटील, उपमहापौर.
पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क कमळ
By admin | Published: March 08, 2017 4:25 AM