ठाणे : वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली असून या कामासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ‘आरटीओ’च्या या पुढाकारामुळे दलालांचा हस्तक्षेप पूर्णत: बंद होईल.नवीन वाहन विकण्यापूर्वी वाहन वितरकांना वाहनांची नोंदणी ‘आरटीओ’कडे करावी लागते. पारंपरिक पद्धतीनुसार त्यासाठी वितरकांना ‘आरटीओ’कडे कागदपत्रे जमा करावी लागत. त्यासाठीचे शुल्कही रोख स्वरूपात भरावे लागत असे. ही कामे त्वरित आणि सुलभ पद्धतीने व्हावी, यासाठी बहुतांश वाहन वितरकांकडून दलाल पोसले जायचे. वितरक हा अतिरिक्त खर्च अर्थातच ग्राहकांकडून वसूल करायचे. दलालांची ही साखळी संपुष्टात आणण्यासाठी ‘वाहन : ०४’ नावाचे अद्ययावत ई-रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाने या सॉफ्टवेअरनुसार कार्यप्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार, वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत थेट आॅनलाइन पद्धतीने होत आहे. आता ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना केवळ वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करावी लागणार आहे. वाहनाचा चॅसिस क्रमांक आणि निर्धारित निकषांची पूर्तता करण्यात आल्याची खातरजमा ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच वाहन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेचे प्रशिक्षण संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. वाहन नोंदणीची नवी प्रक्रिया सुलभ आणि वेळ वाचवणारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीची गुढी
By admin | Published: March 28, 2017 5:43 AM