कल्याण : येथील पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील डम्पिंगला मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे पसरलेली आग बुधवारी दिवसभर धुमसतच होती. गुरूवारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, परंतु धुराचे लोट कायम राहिल्याने परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. आग डम्पिंग ग्राउंडवर खोलवर लागलेली असून त्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.
दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या बाजूस मंगळवारी रात्री आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. गुरुवारी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि १२ पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग पूर्णपणे शमविण्याचे काम सुरू असून धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. सुमारे तीन ते चार एकर परिसरातील कचऱ्याला आग लागली असून ती खोलवर गेली आहे.
------------------------
लवकरच डम्पिंग बंद होणार?
गेल्या काही महिन्यांपासून केडीएमसी परिक्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षापर्यंत डम्पिंगवर ६५० टन कचरा टाकला जायचा. आता त्याचे प्रमाण आता अवघे ४० ते ४२ टनांवर आले आहे. लवकरच हे प्रमाण आणखी कमी होऊन डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आधारवाडी डम्पिंगवर कचरा जाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे असे स्पष्ट केले; परंतु डम्पिंग कधी बंद होणार याबाबत त्यांनी मौन बाळगले.
------------------------