ठाणे : शिवाईनगर येथील एका ४४ वर्षीय महिलेला एक कोटी २५ लाख ७५ हजारांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आठ लाख रुपये लुबाडल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुनील शर्मा, एम.पी. राजकुमार आणि ओमप्रकाश या तिघांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील महिलेला कौन बनेगा करोडपती (केबीसी) कंपनीतर्फे सव्वा कोटीची लॉटरी लागल्याचे २० मे २०१५ रोजी सांगण्यात आले. त्यानंतर, तिची दिशाभूल करून केबीसी कंपनीचे तसेच आयकर अधिकारी असल्याची या शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी बतावणी केली. अर्थात, ही लॉटरी मिळविण्यासाठी सव्वा कोटीच्या करापोटी लागणारी रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडून २० मे ते १७ जुलै २०१५ या कालावधीत महाराष्ट्र बँक आणि आयसीआयसीआय या बँकेच्या खात्यांमध्ये विविध कारणांसाठी आठ लाख रुपयांचा भरणा करण्यास सांगितले. हे पैसे घेऊनही लॉटरीचे पैसे त्यांना दिलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने त्यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी.एम. दायमा हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
लॉटरीच्या आमिषाने आठ लाखांची फसवणूक
By admin | Published: July 27, 2015 1:12 AM