अनिकेत घमंडी
डोंबिवली : विधानसभेत महिला आरक्षण लागू झाले तर १८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक सहा महिलांना आमदारकीची लॉटरी लागू शकते. २०२९ मध्ये हे आरक्षण अमलात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिलांना राजकीय करिअर करण्याची संधी मिळणार आहे.
सध्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, ओवळा माजीवडा, कोपरी, ऐरोली, बेलापूर, मुंब्रा, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडीमध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा भाईंदर असे १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये अवघ्या मीरा भाईंदरमध्ये गीता जैन वगळता एकही महिला आमदार नाही.
भविष्यात २०२९ मध्ये ३३ टक्के आरक्षण विधानसभा निवडणुकीत लागू केले, तर ठाणे जिल्ह्यात सहा महिला आमदार निवडून येऊ शकतात. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथून सर्वाधिक महिला आमदार निवडून जाऊ शकतात, त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष महिला संधी देण्याची चाचपणी करत आहेत.
सध्याच्या राजकीय स्थितीचा धांडोळा घेतल्यास भाजपकडे अनेक महिला पदाधिकारी आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे महिला पदाधिकारी कमी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, मनसेची स्थिती जवळपास तशीच असून भाजप वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांना महिलांचे प्रतिनिधित्व वाढवावे लागणार आहे.