ठाणे : घरातून पळून जाताना आपल्याला कोणीही ओळखू नये, यासाठी बुरखा घालून पळणाऱ्या अंबरनाथ येथील प्रेमीयुगुलाचे बिंग पुरुष सॅण्डलमुळे फुटले. ठाणे लोहमार्ग पोलिसांनीशुक्र वारी रात्री ठाणे रेल्वेस्थानकात बुरखाधारी महिलांच्या वेशातील दोघींपैकी एकीच्या पायात पुरु षी सॅण्डल दिसल्याने संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना पकडले. त्या दोघांची चौकशी केल्यावर एक एकोणीसवर्षीय मुलगी, तर १७ वर्षे नऊ महिन्यांचा एक मुलगा आढळल्याने त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या हवाली केले. तसेच ते दोघे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी भुवनेश्वर येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.शुक्र वारी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वत्र दहीहंडी उत्सवाची धामधूम सुरू असताना ठाणे रेल्वेस्थानकात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या दोन बुरखाधारींना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानकातून ताब्यात घेतले. गस्तीवरील पोलिसांच्या नजरेस दोन बुरखाधारी पडले, त्यातील एकाने पुरु षी सॅण्डल घातल्याचे दिसून आल्याने त्यांची तपासणी केली असता सॅण्डल परिधान केलेला बुरखाधारी चक्क पुरु ष असल्याचे समोर आल्यावर सतर्क झालेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. तेव्हा बुरखा परिधान करून एक तरुणी आपल्या अल्पवयीन प्रियकरालाही बुरख्यात दडवून घरातून पळून भुवनेश्वर येथे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी निघाले होते. त्यासाठी त्यांनी शैक्षणिक कागदपत्रे बॅगेत घेतली होती. त्यातच, त्यांची कल्याण येथे गाडी सुटल्याने ते ठाण्यातून जाण्यासाठी आले होते. मुलगा इलेक्ट्रॉनिकस अभियंत्याचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी ही नेटच्या परीक्षेची तयारी करत आहे.ते दोघे एकाच परिसरात राहत असून त्यांची शाळेतील ओळख आहे. पळून जाण्यासाठी त्यांनी पॉकेटमनीतून पैसे वाचवून बुरखे खरेदी केले होते. तसेच मुलाकडे २० रुपये, मोबाइल फोन होता. चौकशीत दोघांनी पालकांचे नंबर दिले नाहीत. बॅगा तपासल्यावर त्यात नंबर मिळाला. पालकांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.
पुरुषी सॅण्डलमुळे प्रेमीयुगुलाचे बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:08 AM