ठाणे : आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत शिवपाल चौधरी (२०) आणि खुशी चौधरी (१९) या दोघांनी खारेगाव येथील खाडीत स्वत:ला झोकून दिले. शेरोशायरीच्या चिठ्ठ्या तयार करून आम्ही १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खारेगाव खाडीत आत्महत्या करत आहोत, असा व्हिडीओ त्यांनी मोबाइलमध्ये तयार करून ठेवला होता. या दोघांचाही ठाणे अग्निशमन दलाला उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.खारेगावच्या खाडीत तरुणतरुणीने उडी घेतल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कळवा उपविभागाचे अमित सिंग आणि बोरगावकर या दोन पोलिसांना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांना एक बॅग मिळाली. याच बॅगेत काही चिठ्ठ्या आणि मोबाइल मिळाला. हा मोबाइल शिवपालचा असल्याची माहिती प्रसन्ना मौन्सी या त्याच्या सहकाऱ्याकडून पोलिसांना मिळाली. बॅगेतील आधारकार्डच्या आधारे तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती समोर आली. तिचा आणि त्याचा नेमका पत्ता समजलेला नाही. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठाणे अग्निशमन दलाच्या मदतीने खारेगावच्या खाडीत या दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, खाडीला पाणी जास्त असल्याने तसेच पावसाचा जोरही जास्त असल्याने त्यांचा शोध लागू शकला नाही. या दोघांचाही शोध सुरू असून त्यांनी दुपारी खाडीत उड्या घेतल्याचे एका व्यक्तीने पाहिले, अशी नोंद नारपोली ठाण्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक संजय भेंडे यांनी सांगितले.
प्रेमीयुगुलाने खारेगाव खाडीत घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:28 AM