डोंबिवली : महिला प्रवाशांसह ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांनी मागणी केल्यानूसार मध्य रेल्वेने लॉकडाऊननंतर अखेरीस ६ महिन्यांनी पुन्हा लेडीज स्पेशल लोकल गुरुवारपासून सुरु केली. पण पहिल्या दिवशी त्या लोकलला महिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण येथून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास निघालेल्या लोकलमध्ये डोंबिवली, दिवा, ठाणे येथून फारशा महिला चढल्या नसल्याची माहिती मिळाली.
पहिलाच दिवस असल्याने कदाचित महिलांना त्या लोकल फे-यांसंदर्भात माहिती नसावी, अजून आठवडाभर अंदाज घेऊन त्यानंतर त्या लेडीज स्पेशल लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात मागणी करायची की नाही ? हे ठरवण्यात येणार असल्याचे उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने सांगितले. काही महिलांनी सांगितले की, फेब्रुवारीपर्यंत देखील कल्याण येथूनच लेडीज स्पेशल लोकल सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी सुटत होती, डोंबिवलीला ती लोकल सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी यायची, ठाकुर्ली,डोंबिवलीत ती पूर्ण भरलेली असायची, त्यामुळे एक तर लोकलचे वेळापत्रक जून्या वेळेनूसार ठेवावे, म्हणजे त्या सवयीनूसार प्रवास करणे सोपे जाईल.
काही महिलांचे म्हणणे आहे की, सकाळी ९ वाजता लोकल सोडण्यात यावी, सध्या त्या वेळेत रेल्वे स्थानकांमध्ये महिलांची गर्दी वाढत आहे. तर काहींनी सांगितले की, गुरुवारी जशी रिकामी लोकल धावली, त्यातच फिजीकल डिस्टन्स राखला गेला. एवढ्याच रिकाम्या लोकल धावल्या, जेवढी आसन व्यवस्था आहे तेवढेच प्रवासी डब्यात असले तर कोरोनाला प्रतिबंध राखणे सोपे जाणार आहे. महिला प्रवाशांच्या विविध प्रतिक्रिया येत असल्याने आगामी काळात लेडीज स्पेशल लोकलच्या फे-यांमध्ये वाढ करावी, एक लोकल फेरी कल्याण येथून सकाळी आधीच्या वेळेत सोडावी तर अन्य एखादी लोकल सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बदलापूर येथून मुंबईसाठी सोडावी अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.