उल्हासनगर महापालिका निवडणुकीत सर्वाेच्च ४२ टक्के मतदानाची नोंद आहे. यापूर्वी ती ३५ टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ३९, तर २०१४ मध्ये ती ४३ टक्के होती. पाच लाख ६ हजार ९८ मतदारांपैकी फक्त ४३ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापूर्वी विधानसभा व पालिकेतील मतदानाची टक्केवारी ३३ च्या पुढे गेलेली नाही. राज्यात सर्वाधिक नीचांकी मतदानाची नोंद उल्हासनगरात झाली. याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत महापालिका हद्दीतील सर्वच मतदारयाद्यांचे पुनर्सर्वेक्षण केले. यादीतील दुबारा-तिबारा नावे, स्थलांतरित झालेले, मृत व्यक्तींची नावे वगळली. पुनर्सर्वेक्षणात ८१ हजार मतदारसंख्या कमी झाली. त्यामुळे नवीन मतदारयादीत ४ लाख १५ हजार ८५६ मतदारांची नोंद झाली आहे.२००७ च्या महापालिका निवडणुकीत सरासरी ३४, तर २०१२ च्या निवडणुकीत ४१.२३ टक्के मतदान झाले होते. पालिका निवडणुकीत उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना निवडणुकीसाठी बाहेर काढतात. तरीही, मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याने बोगस नावे व दुबारा-तिबारा नावे असल्याची चर्चा झाली. निवडणूक आयोगाने मतदारयादीचे पुनर्सर्वेक्षण केल्याने ८१ हजार मतदार कमी झाले. या प्रकारामुळे मतदान टक्का वाढण्याची शक्यता राजकीय पक्षांनी व्यक्त केली. मतदानाचा टक्का ७० च्या पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार असल्याचे सूतोवाच महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले. मतदानाबाबत जागृती करून विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. उल्हासनगरात सिंधी समाजाचा एकछत्री अंमल होता. त्यानंतर मराठी, उत्तर भारतीय नागरिकांनी राजकारणात आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. नगर परिषदेत फक्त सिंधी समाजाकडे नगराध्यक्षपद गेले. मात्र, महापालिका होताच महापौरपद सर्वाधिक काळ मराठी समाजाकडे गेले. सिंधीबहुल शहरात मराठी नगरसेवक जास्त निवडून येऊन मराठीराज सुरू झाले. त्यामुळे सिंधी समाज धोक्यात आला, अशी आवई उठवण्यात आली. महापालिकेला हरिदास माखिजा, ज्योती कलानी, कुमार आयलानी, आशा इदनानी यांच्या रूपाने सिंधी, तर यशस्विनी नाईक, लीलाबाई आशान, राजश्री चौधरी, विद्या निर्मले, अपेक्षा पाटील यांच्या रूपाने मराठी समाजाचे महापौर झाले. तसेच उत्तर भारतीय असलेल्या मालती करोतिया महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत पप्पू कलानी, ज्योती कलानी, भाजपाचे लाल पंजाबी, कुमार आयलानी, नरेंद्र राजानी, शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे, राजेंद्र चौधरी, जीवन इदनानी, सचिन कदम, डॉ. जयराम लुल्ला आदी नेत्यांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी स्वत: फिरले होते. मतदान कोणालाही करा, पण लोकशाहीवाढीसाठी मतदान करण्याची गळ घातली होती.
नीचांकी मतदानाची टक्केवारी पुसली जाणार?
By admin | Published: January 23, 2017 5:17 AM