भिवंडी - शहर व ग्रामीण भागात बुधवारी पहाटेपासून पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली असल्याने मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला होता. तर अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहवयास मिळाले असून घर व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते.
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दुपारनंतर पावसाने उशिरापर्यंत उसंत घेतल्याने ठिकठिकाणी सखल भागात साचलेले पाणी ओसरायला लागल्याने नागरिकांना काहीवेळ उसंत मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात सकाळ पासूनच वीज पुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, मुसळधार कोसळलेल्या पावसाने भिवंडी महानगर पालिकेचा नाले सफाईचा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरला . शहरातील नाले ,गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले शिरले होते. त्यामुळे नागरिकांचा मनपा प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतांना दिसला.
शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल , नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर ,आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कंपाऊंड, कल्याण नाका येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत. तीनबत्ती येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य वस्तू देखील वाहून गेला तर काही भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपला भाजीपाला वाहत्या पाण्यात टाकून पाळायन केले. महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, ईदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले.