लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात बुधवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर काहीसा कमी झाला. मात्र, या पावसामुळे रेल्वेस्थानकाबाहेरील पूर्वेला राथ रोड, भोपर, म्हात्रेनगर, नांदिवली, महात्मा फुले रोड आणि ठाकुर्ली येथील काही भागांत पाणी साचले. नाल्यांची अर्धवट राहिलेली कामे तसेच नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे नागरिकांनी सांगितले.
कोपर स्थानकालगत पूर्वेला म्हात्रेनगर येथे नाल्याचे तोंड अरुंद असल्याने तेथे अनेक सोसायट्यांच्या प्रवेशद्वारात पाणी साचले. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास अनेकांची घरे पाण्याखाली जातील, अशी भीती माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी व्यक्त केली. नांदिवलीतील श्री स्वामी समर्थनगरमध्येही रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी आमदार राजू पाटील यांना या परिसराचे फोटो, व्हिडिओ पाठवून समस्येतून सुटका करण्याची मागणी केली. वर्षानुवर्षे ही समस्या सुटत नाही. केडीएमसीकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. हा तर पहिलाच पाऊस होता, आणखी साडेतीन महिने जायचे आहेत, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली.
पश्चिमेला महात्मा फुले रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पाच महिन्यांपासून सुरू आहे. तेथे बुधवारी पावसाचे पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप आले होते. याबाबत नागरिकांनी मनपाच्या उपअभियंत्यांना जाब विचारला; पण ते निरुत्तर होते. कंत्राटदाराच्या कामगारांनी नागरिकांना उडवाउडवीची उत्तर दिल्याचे रिक्षाचालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी सांगितले.
पूर्वेतील मानपाडा रस्त्यावर केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ पाणी साचले होते. ठाकुर्ली, कचोरे त्याचबरोबर एमआयडीसीत एम्स रुग्णालय रस्ता, कल्याण-शीळ रस्त्याचा सर्व्हिस रोड, स्टरलिंग पॅलेस सोसायटीसमोर आदी ठिकाणी पाणी तुंबले होते. भोपरमध्ये पाणी साचल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते अमर माळी यांनी केडीएमसीच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, शहरातील ठिकठिकाणी झाडांच्या छाटलेल्या फांद्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या आहेत. पावसात त्या कुजल्याने त्यातून दर्प येत आहे. मानपाडा रस्त्यावर स्टार कॉलनी, शिवाजी उद्योगनगर पोलीस चौकीलगत हे चित्र पाहायला मिळाले. दर्प, डास यामुळे चौकीतील पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--------------------
नांदिवलीत पाणी साचू नये यासाठी मी आयुक्तांची भेट घेत आमदार निधी देण्यात येईल, असे सांगितले; पण त्यांनी नकार दिला. वर्षभरात त्यांनी काहीच उपाययोजना केली नाही. आता पहिल्या पावसात नागरिकांचे हाल सुरू झाले. केडीएमसीकडे निधीची कमतरता आहे, हे समजू शकतो. मग माझा निधी नाकारण्याचे कारण काय?
- राजू पाटील, आमदार
-----------
म्हात्रेनगर येथील पंपिंग स्टेशनमधील यंत्रणा बंद पडली होती. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे यांनी पंप सुरू केले होते; पण आता ते बंद असल्याने शहरातून पावसाच्या आलेल्या पाण्याचा निचरा वेगाने होत नाही. तसेच नव्याने बांधलेल्या नाल्याच्या कामातील चुकांचा फटका रहिवाशांना बसत आहे. आयुक्त याची दखल घेतील का?
- मुकुंद पेडणेकर, माजी नगरसेवक
--------