ठाणे : डुंबरे यांच्या निवडीनंतर भाजपमध्ये निरंजन डावखरे गट विरुद्ध निष्ठावान नगरसेवक असे दोन गट समोर आले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत डावखरे यांच्यासोबत आलेल्या काही नगरसेवकांना महापालिकेत किंवा पक्षातही महत्त्वाची पदे दिली गेली आहेत. यामध्ये नारायण पवार यांना स्थायी समिती सदस्य, गटनेते पद तर भरत चव्हाण यांना देखील स्थायी समिती सदस्यपद दिले. आता पुन्हा डुंबरे यांना गटनेते पद देण्यात आले आहे. तर शहर अध्यक्षपदही बाहेरून आलेल्या डावखरे यांना दिल्याने निष्ठावान नाराज आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनाच जर ही पदे मिळत असतील तर निष्ठावतांनी करायचे काय असा सवाल करून दोन्ही गट आमने सामने उभे ठाकले आहेत.
कमळ फुलविण्याचे स्वप्न धुळीस मिळणार ?
एकीकडे भाजपचे वरिष्ठ मंडळी या आगामी निवडणुकीत भाजप ठाणे महापालिकेवर कमळ फुलविणार असल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे १० ते १२ नगरसेवक फोडणार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यात आता भाजपच्या नगरसेवकांमध्ये पडलेल्या दोन गटांमुळे त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा संघर्ष असाच राहिला तर महापालिकेवर कमळ फुलविण्याचे भाजपच्या वरिष्ठांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे.
चौकट -
सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वर्षभरापूर्वीच सर्व नगरसेवकांच्या बैठकीत, गटनेत्यांच्या बैठकीत डुंबरे यांच्या नावावर एकमत झालेले होते. त्यामुळे त्यांच्या निवडीला कोणाचाही विरोध नाही.
(निरंजन डावखरे - शहर अध्यक्ष - भाजप - ठाणे शहर)