ठाणे : भगव्याची निष्ठा हीच आमची शान शिवसेनेचे शिलदार म्हणून आम्हाला अभिमान, अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील जांभली नाका परिसरात दिसत होते. खासदार राजन विचारे यांच्या वतीने येथे निष्ठेचे थर लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. एकीकडे टेंभी नाक्यावर शिंदे गटाने आठ बॅनर लावून खासदार विचारे यांना आव्हान दिले असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनिकांनीदेखील, आशा स्वरूपाचे बॅनर लावून त्याला प्रतिउत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी राजकीय दहीहंडी आज पाहावयास मिळाली. दोन दिवसांपूर्वी विचारे यांनी जांभली नाक्यावर निष्ठेचे थर लागले जातील, असे सांगत शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी टेंभी नाक्यावर शिंदे गटाने सहा बॅनर लावून थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केल्याचे दिसून आले.
मात्र दुसरीकडे राजन विचारे यांनीदेखील जांभली नाका परिसरात शिवसेनेच्या निष्ठेविषयी बॅनर लावून त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले. भगव्याची निष्ठा हीच आमची शान शिवसेनेचे शिलदार म्हणून आम्हाला अभिमान, निष्ठेचा थर एकतेचा बाज, संस्कृतीचा साज हिंदुत्वाचा आवाज, अशा आशयाच्या बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होते.