लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचे लुधियानातील एका कंपनीशी कनेक्शन तपासात उघडकीस आले आहे. कॉल सेंटरच्या आर्थिक व्यवहारांमध्ये या कंपनीचा संबंध दिसत असल्याने पोलीस यंत्रणा त्याचा सखोल तपास करत आहे.अंबरनाथ (पूर्व) येथे माउंट लॉजिक सोल्युशन्स या नावाने चालविण्यात येणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ८ जून रोजी रात्री छापा टाकून ८ आरोपींना अटक केली होती. अमेरिकन नागरिकांना कोलंबस बँकेच्या नावे आधी कर्जाचे आमिष दाखवायचे, त्यांनी तयारी दर्शवल्यानंतर काही दिवसांनी कर्ज मंजूर झाल्याचे सांगून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली १०० ते ५०० डॉलर्स उकळायचे, असा उद्योग या कॉल सेंटरमध्ये दोन वर्षांपासून सुरू होता.प्रक्रिया शुल्क देण्यासाठी तेवढ्या रकमेचे आयट्यूनकार्ड विकत घेण्यास सांगून कार्डवरील १६ अंकी क्रमांक समोरच्या व्यक्तीकडून घेतला जायचा. हा क्रमांक कॉल सेंटरच्या व्यवस्थापकाकडून लुधियानातील एका कंपनीला दिला जायचा. या क्रमांकाच्या आधारे आयट्यूनकार्डाची रक्कम ‘कॅश’ करण्याचे काम ही कंपनी करायची, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
अंबरनाथच्या बोगस कॉल सेंटरचे लुधियाना कनेक्शन
By admin | Published: June 13, 2017 1:19 AM