भिवंडी- गोवंशीय जनावरांना लम्पी रोगाची लागण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होऊ लागल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून लम्पि प्रतिबंधक लस सर्वच गोवंशीय जनावरांना दिल्यानंतर सुद्धा भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथील राधेकृष्ण गोशाळा या ठिकाणी असलेल्या एका गाईस लम्पीची लागण झाल्याने गाय दगावल्याची घटना मंगळवारी घडली आहे.
भिवंडी तालुक्यातील राहनाळ चरणीपाडा या ठिकाणी राधेकृष्ण गोशाळा असून त्या ठिकाणी एकूण ३४ गायी आहेत. त्या सर्वाना पंचायत समिती पशुधन विभागा कडून लम्पी प्रतिबंधक लस १९ सप्टेंबर रोजी देण्यात आली होती.त्यानंतर येथील एका जर्सी गाईस लम्पीची लागण झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तिला स्वतंत्र ठेवण्यात आले होते.
पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ देवश्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राहनाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय पर्यवेक्षक हे गायी वर उपचार करीत असतानाच मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी ती मृत झाली असल्याची माहिती राधेकृष्ण गोशाळेचे सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली आहे .खबरदारीचा उपाय म्हणून गोशाळेत औषध फवारणी करून घेत मृत गायीचे दफन करण्यात आले आहे.