ठाणे - दुपटीने विमा परतावा देण्याचे अमिष दाखवून फिनीक्स रेलकॉन कंपनीचे चंद्रकांत इंगवले यांनी व त्यांच्या साथीदारांनी भिवंडीतील फुरकान अन्सारी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांची सुमारे चार कोटी ४५ लाख ७८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.इंगवले याने नौपाडयातील शिवाजीनगर येथे फिनीक्स नेलकॉन प्रा. लि. या कंपनीचे २००८ मध्ये कार्यालय थाटले. याठिकाणी काही कर्मचा-यांची भरती करुन त्यांच्यामार्फतच त्याने अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला. या कंपनीमार्फत त्यांनी आकर्षक विमा परतावा देण्याच्या योजनेचे अमिष दाखविले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर पाच आणि सात वर्ष मुदतीवर ठेवी ठेवल्यास मुदतीअंती दुप्पट रकमेचा आणि आकर्षक विमा देण्याचे प्रलोभन दाखविले. याच अमिषापोटी अन्सारी यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांकडून त्यांनी ५० हजार, एक लाख, दहा हजार, २५ हजार अशा वेगवेगळया रकमा २००८ ते २०१७ या नऊ वर्षात जमा केल्या. या रकमा जमा करुनही त्यावरील व्याज किंवा गुंतविलेली मुद्दलही त्यांना परत केली नाही. करोडो रुपयांची रोकड परत करण्याऐवजी तिचा इंगवले आणि त्याच्या साथीदारांनी अपहार केला. गुंतवणूकदारांनी विचारपूस करण्यास सुरुवात केल्यानंतर या कंपनीतील कर्मचा-यांनी योजना चांगली आहे, परंतु, कंपनीत काही आर्थिक समस्या असल्यामुळे पेमेंट करण्यास उशिर होत असल्याचे कारण सांगण्यास सुरुवात केली. मुळात, इंगवले याने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन फिनीक्स रेलकॉनमध्ये वेगवेगळ्या पदांवर अधिकारी आणि कर्मचा-यांची भरती केली. याच कर्मचाºयांकडून तो लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. कालांतराने गुंतवणूकदारांनी पाठपुरावा केल्यामुळे त्याने ठाण्यातील कार्यालय बंद करुन आपल्या साथीदारांसह पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अन्सारी यांच्यासह अनेकांनी २६ सप्टेंबर २०१७ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. इंगवले आणि त्याच्या टोळीने ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच उत्तर प्रदेशातील गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांच्या रकमा उकळल्या आहेत. या टोळीचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.