जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने ठाण्यातील खासगी कंपनीतील अधिकारी राधेश्याम विजयकुमार गुप्ता (वय ३९) यांची नऊ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील चितळसर मानपाडा भागात राहणाऱ्या गुप्ता यांना जुलै २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ यादरम्यान एका अनोळखी मोबाइलधारक भामट्याने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंगचे ट्रेंनिग देण्याचा बहाणा करीत एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे एसबीआय आयएनटी हे ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास माेठा नफा देण्याचे त्यांना आमिषही दाखविले.
त्यानंतर अज्ञात भामट्याने गुप्ता यांच्याकडून ९ लाख ७० हजारांची रक्कम त्याच्या विविध बँक खात्यावर ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. ती रक्कम त्यांना परतही केली नाही. शिवाय, काेणताही जादा नफा मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्ता यांनी ३ सप्टेंबर २०२४ राेजी कापूरबावडी पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.