मंगेश कराळे
नालासोपारा - विरार जवळील वैतरणा जेट्टीवर शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच घरातील चार महिला सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्यात पडल्या. या दूर्घटनेत दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मुत्यू झाला तर इतर दोघींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. वैतरणा जेटीवर दररोज संध्याकाळी अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी व फिरायला येतात. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास वैतरणा गावातील राजस्थानी कुटुंबातील तीन बहिणी व एक लग्न होऊन आलेली सून अशा चौघी वैतरणा जेट्टीवर फिरायला गेल्या होत्या. यावेळी मोबाईलमध्ये चौघी सेल्फी काढत असताना घरातील सुनेचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. यावेळी तिला वाचवण्यासाठी गेलेल्या सख्ख्या तीन बहिणी देखील पाण्यात पडल्या. या घटनेत १७ व २१ वर्ष वयाच्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाला, तर १३ वर्षांची मुलगी व २५ वर्षांची सुन यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी लोकमतला दिली.
मृत मुलींची नावे :- संतू गिसुसिंह दासणा (१५), नीला धमीसिंह दसाना (२४)
वाचलेल्या मुलींची नावे :- बसंती गीसुसिंह दसाना (१४), प्रेमा नारायण दासाना (२३)