ठाणे: ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाने (Motor Accidents Claims Tribunal) रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ६७.८० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र अपघात न्यायाधीकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांनी सोमवारी हा आदेश दिला. या आदेशानुसार अपघातासाठी जबाबदार असलेल्या बस कंपनीच्या मालकाला आणि वाहनाच्या विमा कंपनीला दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ७.५० टक्के व्याजासह संयुक्तपणे आणि वैयक्तिकरीत्या ही भरपाई देण्याचा आदेश दिले आहेत.
गुंडू तुकाराम गावडे हे १२ सप्टेंबर २०१९ रोजी बंगळुरूला बसमधून प्रवास करीत हाेते. त्यावेळी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू महामार्गावरील म्हसवे गावाजवळ बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस एका ट्रकला धडकली. अपघाताच्या वेळी गावडे हे ४३ वर्षांचे होते. या अपघातात गावडे आणि इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दावेदारांचे वकील संभाजी कदम यांनी न्यायाधीकरणाला सांगितले. त्यांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता गावडे यांचा मृत्यू झाला हाेता. कदम म्हणाले की, गावडे यांचा व्यवसाय होता आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख सात हजार ४४७ रुपये होते. ठाण्यात राहणारी त्यांची पत्नी, दोन मुली आणि वृद्ध आई त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांनी त्यानुसार ८१ लाख ९२ हजार ३०४ रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक न्यायाधीकरणासमोर हजर झाले नाहीत आणि त्यांनी कोणतेही निवेदनही दिले नाही, म्हणून त्याच्याविरुद्ध एकतर्फी आदेश काढण्यात आला. मात्र, वाहनाच्या विमा कंपनीने दावा लढवला. न्यायाधीकरणाने व्यावसायिकाच्या कुटुंबाला ६७.८ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, यापैकी ३०.८ लाख रुपये व्यावसायिकाच्या पत्नीला, १४-१४ लाख रुपये त्याच्या मुलींना आणि ९ लाख रुपये त्याच्या आईला देण्यात येणार आहेत.