मुरलीधर भवार
कल्याण : छगन भुजबळ, महादेव जानकर व पंकजा मुंडे या नेत्यांना रिंगणात उतरवून भाजपने वसंतराव भागवत यांच्या काळातील ‘माधव’ समीकरण पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात या तिन्ही समाजाची मते आहेत. ग्रामीण भागात माधव पॅटर्न जेवढा प्रभावी ठरतो, तेवढा तो कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरी भागात प्रभावी ठरत नसला, तरी भाजप पुन्हा आपली मूळ व्होट बँक राखण्याकरिता प्रयत्नशील असल्याचा संदेश देणे सुरु केले आहे.
ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघ जनसंघाच्या काळापासून उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांना अनुकूल राहिला आहे. भाजपने काँग्रेसच्या मराठा व्होट बँकेच्या राजकारणाला शह देण्याकरिता माधव पॅटर्न राबविला होता. माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मते एकत्रित केली, तर प्रभावशाली ठरतात, हे भाजपने या पॅटर्नद्वारे दाखवून दिले.
माळी समाजाची दोन्ही मतदारसंघांत ४० ते ५० हजार मते आहेत. भिवंडीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. कल्याण लोकसभेच्या बाबतीत माळी समाजाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.- प्रशांत माळी, माळी समाजाचे प्रतिनिधी
कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत धनगर समाजाची ७० हजार मते आहेत. वंजारी आणि माळी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा नसला, तरी धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरू आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आरक्षणाविषयी काही हमी दिली जाते, त्यानुसार कोणाला मते द्यायची ही भूमिका जाहीर करणार आहे.- शिरीष लासुरे, धनगर समाजाचे प्रतिनिधी