ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी "वाचन प्रेरणा दिना" निमित्त घेतलेल्या आवडलेल्या पुस्तकांवर "रसग्रहण" लिहिण्याच्या स्पर्धेत माधुरी बागडे या प्रथम आल्या आहेत, तर सीमा जोशी यांनी दुसरा क्रमांक, तर प्रतीक्षा बोर्डे यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त १५ ऑक्टोंबर हा दिन दरवर्षी "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांनी संयुक्तपणे "वाचन प्रेरणा दिन" साजरा केला. या निमित्ताने आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला वाचकांनी उत्स्फ़ूर्त प्रतिसाद दिला, या स्पर्धेत अरूण शेवते यांच्या "एकच मुलगी" या पुस्तकाच अप्रतिम रसग्रहण माधुरी बागडे यांनी केले होते, त्यांनी रसग्रहण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या "शहाण्या माणसांचा सायकिअँट्रिस्ट" या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण रसग्रहण सीमा जोशी यांनी केले होते, त्यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. तर कवी महेंद्र कोंडे यांच्या "बावनकशी" या कवितासंग्रहाचं रसभरीत रसग्रहण केल्याप्रकरणी प्रतीक्षा बोर्डे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. शरदचंद्र घाटे, अनुराधा मेहेंदळे, विनिता आगाशे, रमेश भुरे, सुरेंद्र पाटील यांनाही या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
डॉ. वसुधा सहस्त्रबुध्दे, धनश्री करमरकर व महेश शानभाग या कला-साहित्य क्षेत्रातील धुरिणांनी अमृता प्रीतम, सआदत हसन मंटो व प्रतिभा राय या जगप्रसिध्द साहित्यकांच्या अजरामर कथांचे अभिवाचन केले. अमृता प्रीतम यांच्या "सोलवॉ साल" या संवेदनशील कथेचे प्रतिभा राय यांच्या "चंद्रभागा आणि चंद्रकला", या जगात न संपणारी दु:ख आहेत हा संदेश देणार्या कथेचं आणि सआदत हसन मंटो यांच्या फ़ाळणीतील "हिंदु-मुस्लिम सैनिकांची व्यथा" मांडणारी "शेवटचा सलाम" कथा आणि "लायसन्स" या अब्बू-नीतीचे प्रेम व्यक्त करणार्या कथेच अभिवाचन सादर केले. रसिक प्रेक्षकांनी या अभिवाचनाला उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या निवडणुकीतील कामगिरीबाबत सदाशिव जोशी, निशिकांत महांकाळ आणि मोहन देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. रसग्रहण स्पर्धेचे परीक्षण सीमा दामले व आशा जोशी यांनी केले. यावेळी बोलताना मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी वाचक व ग्रंथालय पुस्तकरूपी सहभागासाठी "ग्रंथगंगा" या अभिनव योजनेची घोषणा केली. सर्व मान्यवरांचे स्वागत मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यवाह अनिल ठाणेकर यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यकारीणी मंडळ सदस्य दुर्गेश आकेरकर यांनी केले.