मीरा रोड : अमली पदार्थ विकणारे माफिया हे हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करीत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला. पोलिसांनी पाच तलवारींसह आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त करून तिघांना अटक केली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमलीपदार्थविरोधी कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरसह अनिल पवार, वसीम शेख, गणेश वनवे असे पोलीस पथक रविवारी पहाटे गस्त घालत असताना घोडबंदर आरटीओजवळील शिफ्टिंग वसाहत येथून पाच जण चालले होते. पोलिसांनी हटकले असता ते पळू लागले. पोलिसांनी तिघांना पाठलाग करून पकडले. तर दोघे जण त्यांच्या कंदील तलवारी टाकून पळाले.
पोलिसांना पाच तलवारी आणि आठ लाखांचे ८० ग्रॅम इतके मेफेड्रॉन अमलीपदार्थ सापडले. पोलिसांनी संदीप नांगरे (३२), सूर्यकांत करळकर (२७) व शाकिर सय्यद (३४) या तिघांना अटक केली असून, हे सर्व घोडबंदर शिफ्टिंगमध्ये राहणारे आहेत. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. जब्बार व साहिल हे फरार आरोपी आहेत. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार करीत आहेत.