लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मासिक पाळीसंबंधी अंधश्रद्धांवर भाष्य करून त्या नष्ट करण्याच्या प्रमुख हेतूने साजरा होणारा हा मासिक पाळीचा उत्सव, म्हणजेच मासिका महोत्सव. यावर्षी खंडीय सीमा ओलांडून आफ्रिकेतील सहा देशांतही तो आयोजित केला जात आहे. भारत आणि नेपाळसह केनिया, नामिबिया, रॉंडा, दक्षिण सुदान, युगांडा आणि झांबियातही हा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे.
मासिका महोत्सव भारत आणि नेपाळमध्ये २०१७ साली साजरा करण्यात आला. कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावमुळे २०२१ चा हा उत्सव भारत व नेपाळमध्ये बहुतांशी प्रमाणात ऑनलाइन स्वरूपात, तर आफ्रिकेत ऑफलाइन स्वरूपात विविध उपक्रमांनी भरलेला असणार आहे.
म्युज फाउंडेशन या युवा संस्थेमार्फत शाश्वत स्वरूपात मासिक पाळी हाताळणे यासाठी ''अ पिरियड ऑफ शेअरिंग'' हा उपक्रम राबवला जातो. कोविड-१९ या वैश्विक संकटामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरांवर मासिक पाळी संदर्भात वेगवेगळ्या समस्यांची तीव्रता वाढली तसेच वाढत्या आर्थिक असमानतेमुळे, आशिया आणि आफ्रिकेतील स्त्रिया आणि तृतीयपंथीना मासिक पाळी दरम्यान गरजेच्या सुरक्षित सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे मासिक पाळी सणासारखी साजरी करून निषिद्ध समजल्या जाणाऱ्या मासिक पाळीसारख्या विषयात हात घालणे. विविध प्रकारची गाणी, खेळ, नाच व इतर उपक्रमांद्वारे मासिक पाळीविषयी संवाद सुरू करण्यास मदत होणे व लोकांना त्यांच्या कोशातून बाहेर काढण्यास मदत करणे हा उद्देश या महोत्सव मागे आहे. यामुळे महिलांना व तृतीयपंथीना मासिक पाळी संदर्भात उघडपणाने संवाद साधणे शक्य होते. ज्या सामान्य व नैसर्गिक क्रियेमुळे जीवसृष्टी कायम राहते त्या संबंधी मोकळ्या मनाने त्या संवाद साधू शकतात. याचा अजून एक उद्देश म्हणजे पुरुषांना मासिक पाळीविषयी बोलते करणे हाही आहे. जेणेकरून पुरुष आपल्या सामाजिक विशेषाधिकारांचा वापर करून मासिक पाळी विषयीचे गैरसमज दूर करू शकतात.