- दा.कृ. सोमण
गेल्या काही वर्षांत भाद्रपदातील गणेशचतुर्थीप्रमाणेच माघातील ही गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यास सुरुवात झाली आहे. नरांतक या राक्षसाला ठार करण्याकरिता कश्यपाच्या पोटी गणपतीने विनायक या नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव म्हणून साजरी केली जाते. घरोघरी गणपती आणण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. भाद्रपदात पावसामुळे गणेशोत्सवातील कार्यक्रमांवर विरजण पडते. माघात निसर्गाच्या लहरी कारभाराचा फटका कार्यक्रमांना बसत नाही. परिणामी, माघी गणेशोत्सव गणेशप्रेमींमध्ये लोकप्रिय होत आहे.गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते, तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. माघी गणेशोत्सवाचे वाढते उत्सवीकरणगेल्या काही वर्षांत माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढू लागली आहे. घरोघरी हा उत्सव साजरा करणाऱ्यांचे प्रमाण त्या तुलनेने खूप कमी आहे. माघ महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला आता इव्हेंटचे स्वरूप आले आहे. यानिमित्ताने सार्वजनिक कार्यक्रम, खेळ, उपक्रमही मोठ्या प्रमाणात आयोजिले जातात. मुळात भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तेव्हा पावसाचे दिवस असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. माघ महिन्यातील या उत्सवादरम्यान अशा प्रकारचा व्यत्यय येत नाही. अर्थात, या काळात परीक्षा सुरू असतात. मात्र, तरीही यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात सर्व जण हिरिरीने सहभागी होतात. उत्सव साजरा करताना ध्वनी, वायू व जलप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. उत्सवामुळे आपण आनंद घ्यायचा असतो आणि इतरांना द्यायचा असतो. चिंता, दु:ख विसरून स्वास्थ्य व मन आनंदी ठेवायचे असते. - शब्दांकन : स्नेहा पावसकरपूजा कशी कराल?मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते. या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम. माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते. या उत्सवादरम्यान गणेशमूर्तीची पूजा करावी, याचा उल्लेख शास्त्रात नाही. प्रत्येकाने स्वत:ला शक्य असेल तसे ठरवावे. पूजा चिंताग्रस्त होऊन करू नये. काही चुकेल, याची भीती बाळगू नये. श्रद्घेने, आनंदाने व समाधानाने पूजा करावी. श्रद्घा, पूर्ण विश्वास, मनाची एकाग्रता साधून काम होते आणि मूर्तिपूजा त्याला मदत ठरू शकते.