ठाणे : माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी, मग कुटुंब आणि त्यानंतर मी स्वत: अशी भावना व्यक्त करत हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच ध्येय माझ्यासमोर आहे. साडी नेसण्यासाठी फक्त ११ दिवस राहिले आहेत. आर्मीच्या युनिफॉर्मसमोर लाखाची साडीही मला फिकी वाटते, अशा भावना पतीच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यदल अधिकारी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या वीरपत्नी गौरी महाडिक यांनी व्यक्त केल्या.श्री शनैश्वर फाउंडेशनतर्फे शुभंकरोती मंडळ हॉल येथे रविवारी झालेल्या ‘आपल्या वीरांगना, आपला अभिमान’ या कार्यक्रमात महाडिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांची मुलाखतही घेण्यात आली. लग्न कसे ठरले, हे सांगताना त्यांनी प्रसाद महाडिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, त्यांचा मला दोन वर्षे १० महिने १५ दिवसांचा सहवास लाभला. या काळात त्यांनी मला सर्व नियम शिकवले होते. जेव्हा मी तिरंगा पाहायचे, तेव्हा अभिमान वाटायचा, आजही अभिमान वाटतो. ते तिरंगा घेऊन आले आणि त्यातूनच गेले, या भावना मनात कायम आहेत. ते आजच्या दिवशी कमिशनर झाले होते आणि पुढच्या वर्षी मीपण होणार, याचा मला अभिमान आहे. त्यांना मी नेहमी हसताना आवडत होते. त्यामुळे मी कधीच रडणार नाही. मला आर्मी जॉइन करून त्यांचा युनिफॉर्म परिधान करून त्यांचे स्टार लावायचे आहेत. प्रशिक्षणासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळते. पूर्वी आर्मीत जाण्याविषयी मी कधीच विचार केला नव्हता. मला त्यांची पत्नी म्हणूनच जगायचे होते. मी ‘सीएस’ केले आहे. मात्र, आर्मीत जाणे माझ्या नशिबात लिहिल्याने तेथे मी पूर्ण तयारीने उतरणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे भाऊ परेश मोहरकर आणि गौरी यांच्या आईवडिलांचाही सन्मान झाला.युद्ध नको उपाय सांगायुद्ध जाहीर करा, असे सर्वचजण म्हणत असतात, पण ते सोपे नाही. सरकारने विचारले तर त्यांना उपाय सांगा, पण युद्ध जाहीर करा, असे म्हणू नका. कारण, आम्ही गमावले आहे, याचे दु:ख आम्हालाच माहीत आहे. युद्ध हा उपाय नाही. सरकार आणि आर्मीवर विश्वास ठेवा, असे गौरी महाडिक यांनी सांगितले.एखादे मूल दत्तक घेण्याचा किंवा दोन मुलांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचा निर्धार व्यक्त करताना हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक आणि हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या नावाने दरवर्षी श्री शनैश्वर फाउंडेशनला २५ हजार रुपयांची देणगी देण्याचे त्यांनी जाहीर केले.आपल्या मुलांचे लग्न करताना पत्रिका पाहू नका, पत्रिकेमागे लागून त्यांचे आयुष्य वाया घालवू नका. त्यांना एखादी व्यक्ती आवडली असेल, तर लग्न करण्याची परवानगी द्या. सुना, जावई आनंदाने स्वीकारा, असा सल्ला त्यांनी दिला.
आर्मी युनिफॉर्मसमोर महागडी साडी फिकी - गौरी महाडिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:39 AM