ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 05 - आपला ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावात १ लाखझाडे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडलेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या वारकऱ्यांमुळे यासंपूर्ण परिसराला वारकरी दिंडीचे स्वरूप लाभले होते. विधायक कार्याच्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली की काय चमत्कार घडू शकतो, याची प्रचीतीच बुधवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी १५ हजारहून अधिक जणांचा सहभाग असूनही कुठलाही गोंधळ न होता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या दोन तासांमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले.
सकाळपासूनच प्रत्येक स्वयंसेवक हातात रोपटे घेऊन मांगरुळचा डोंगर चढताना दिसत होता. छोटा-मोठा प्रत्येकजण हातात रोपटे घेऊन नेमून दिलेल्या जागी वृक्षारोपणास सज्ज होता. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ऊन पावसाच्या सुरू असलेल्या खेळाचा धागा पकडून निसर्गाचीही या उपक्रमाला साथ असल्याची मार्मिक टिप्पणी श्री. ठाकरे यांनी केली. लोकांची शक्ती एकवटली कि किती मोठे विधायक कार्य उभे राहू शकते, हे या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आले आहे, अशा शब्दांत पालकमंत्री श्री शिंदे यांनी कौतुकाची पावती दिली. भारतात आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना या महाअभियानात सहभागी झालेल्या सर्व संस्था, संघटना आणि शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि प्रतिनिधींचे आभार मानले. हा उपक्रम जाहीर केला त्यावेळी मनात धाकधूक होती, परंतु सर्वांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हुरूप आला. चांगल्या कार्याच्या पाठीशी लोक नक्कीच उभे राहतात, हा विश्वास या कार्यक्रमाने दिला, असे ते म्हणाले. केवळ आजच्या दिवशी झाडे लावून हा उपक्रम संपणार नाही. या झाडांची निगा राखली जाईल आणि येत्या पाच वर्षांत इथे मानव निर्मित गर्द वनराई फुललेली असेल, असा विश्वास व्यक्त करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करण्याची ग्वाही देखील श्री शिंदे यांनी दिली.पर्यावरणाचे संवर्धन हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, या हेतूने खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून मांगरूळ येथे १ लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी विविध संस्था-संघटना, शाळा,महाविद्यालये यांना आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सातत्याने बैठका घेतल्या. परिणामी, १५ हजारहून अधिक जणांनी या अभियानात सहभाग घेतला. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. महाराष्ट्र नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांचे विशेष सहकार्य या अभियानाला लाभले.
गेल्या महिन्याभरापासूनच या ठिकाणी या महाअभियानाची नियोजनबद्ध तयारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यानेतृत्वाखाली सुरू होती. या महाअभियानाचे उत्कृष्ट नियोजन हा सर्व उपस्थित मान्यवरांच्या कौतुकाचा विषय होता. कार्यक्रम पार पडल्यानंतर पडलेले प्लास्टिकचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्याबाटल्या आणि अन्य कचरा एनएसएस,एनसीसीचे विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांनीसाफ करून परिसर स्वच्छ केला. याप्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती या महाअभियानाला लाभली.