कसारा : शहापूर विधानसभा मतदारसंघातील तानसा अभयारण्याजवळ असलेल्या बोराळा गावात १५० हून अधिक मतदार आहेत. या गावातील नागरिकांना मतदान करण्यासाठी तानसा गावाजवळ असलेल्या केंद्रात मतदान करण्यासाठी जावे लागते. बोराळा गावातील मतदार सोमवारी मतदान करून परतत असताना तराफा अचानक उलटला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून मच्छीमारांना मदतीसाठी बोलावले. त्यांनी तातडीने मदत करत ९५ जणांचा जीव वाचवला.
बोराळा गावातून मतदान केंद्रांवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने मतदान करण्यासाठी नागरिकांना तानसा धरणातून ताराफ्यातून प्रवास करावा लागतो. सोमवारी दुपारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले शेकडो ग्रामस्थ मतदान करून परत जात असताना तराफा किनाऱ्यावर येत असतानाच उलटला. प्रसंगावधान राखून ग्रामस्थांनी मच्छीमार करणाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला व बहुतेक जण पोहण्यात माहीर असल्यामुळे बचाव कार्यात यश आले.
बोराळा हे गाव तानसा अभयारण्यात वसलेले असून या नागरिकांना जवळील तानसा, अघई, शहापूर बाजारपेठेत येण्यासाठी तानसा धरण ओलांडून यावे लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तानसा धरणातून तराफावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे पावसाळ््यात जनजीवन विस्कळीत असते. दरम्यान, बोराळा गावाचे पुनर्वसन करावे किंवा पर्यायी रस्ता द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे.