भिवंडी : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कर्तव्यदक्ष असणारे भिवंडीतील समाजसेवक महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशात घाटाळ यांचे नाव समाविष्ट केले आहे.
राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत व्यक्ती व संस्था यांना आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार हा राज्य पुरस्कार दरवर्षी प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.
सन २०२१ - २२ मध्ये महादेव घाटाळ यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल राज्य शासनाने घेत घाटाळ यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर केला असून पुरस्कारासोबत रोख रक्कम २५,००१ जाहीर करण्यात आली आहे. मी नेहमीच समाज हिताची कामे निस्वार्थ भावनेने करत आलो आहे.माझ्या कार्याची राज्य शासनाने दखल घेतली हीच माझ्या कामाची पोहोच पावती आहे. या पुरस्काराने भविष्यात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया महादेव घाटाळ यांनी व्यक्त केली आहे.