डोंबिवली: ‘साज और आवाज म्युझिकल फाउंडेशन’तर्फे शुक्रवार, ४ आॅगस्टला ‘महागायक फॉर महानायक’ हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले कलामंदिरात रात्री ८ वाजता होईल. महागायक किशोरकुमार यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी गायलेली गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.डॉ. प्रशांत सुवर्णा, मंदार कोरान्ने, सौरभ मेहता, शिल्पा मालडेकर ही डॉक्टर मंडळी हा कार्यक्रम सादर करतील. संगीतकार मंदार सोमण हे त्यांच्या गायनाला संगीत देणार आहेत. ध्वनिसंयोजन राजू नायडू यांचे, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी मंदार खराडे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीतून जमा होणारा निधी वृद्धाश्रमाला दिला जाणार आहे. सामाजिक कार्याला हातभार लावणाºया इच्छुकांसाठी राहुल एंटरप्रायझेज येथे पास उपलब्ध आहेत. कार्यक्रमाला मदतीचा हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.महागायक किशोरकुमार हे महान पार्श्वगायक होते. त्याबरोबर त्यांनी अभिनय, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक या भूमिकाही उत्तमरीत्या पार पाडल्या. मात्र, त्यांची खरी ओळख महागायकाची आहे. तब्बल आठ वेळा त्यांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांना फारशी गाणी मिळत नव्हती. मात्र, संगीतकार एस.डी. व आर.डी. बर्मन यांच्या संगीत कारकिर्दीत किशोर हे एक मोठे गायक म्हणून उदयाला आले.पार्श्वगायनात फार मोठा ठसा उमटवला. कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण नसताना त्यांनी भल्याभल्या गायकांच्या तोंडाला फेस आणणारी गाणी गायली. विविध रागांत गाणी गाऊन सगळ्यांना चकित केले.देव आनंद, अमिताभ, राजेश खन्ना आणि ऋषी कपूर यांच्यासाठी त्यांनी गाणी गायली. संगीताच्या गोल्डन एरामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा त्यांनी निर्माण केला. त्यातही, महानायक अमिताभसाठी त्यांनी गायलेली गाणी आजही आॅल टाइम हिट्स आहेत. त्याच गाण्याचा आस्वाद ‘महागायक फॉर महानायक’ या संगीत कार्यक्रमातून रसिकांना घेतायेणार आहे.
‘महागायक फॉर महानायक’ उद्या रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:49 AM