ठाणे : देशील सर्व राज्यांमधील सांस्कृतिक, सामाजिक, कलात्मक दर्शन घडविणारे राष्ट्रीय पातळीचे ‘महालक्ष्मी सरस २०१७’ हे प्रदर्शन ११ जानेवारीपासून वांद्रे (प)येथे सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय प्रदर्शनाचे यजमान पद ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे. वांद्रे रेक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र.१ वर सुमारे १२ दिवस या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्राम विकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार पूनम महाजन आदीं या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात देशभरातील बचत गट आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू व खाद्य पदार्थांचे सुमारे ५०० स्टॉल आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशामधील पोचमपल्ली, हस्तकला, चामडी कारपेटस व लॅम्पशेडस, ड्रेस मटेरीयल, मध्यप्रदेशमधील ज्यूटच्या वस्तू, नक्षीकाम, कलात्मक वस्तू, चंदेरी साड्या, मध, तृण - कडधान्य, सुकामेवा, भिंतीवरील तोरणे, पैठणी, अस्सल ग्रामीण स्वाद व चवदार खाद्यपदार्थ, लोणची, कुरडई, पापड, गोडांबी, सोलापूरची चटणी, पुण्याची मासवडी, झुणका भाकर, मोदक, थालीपीठ, यांचीही विक्री होणार आहे. (प्रतिनिधी)
महालक्ष्मी सरस आजपासून
By admin | Published: January 11, 2017 7:21 AM