लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : महाविकास आघाडी सरकारला जे अडीच वर्षांत करता आले नाही, ते शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या पाच महिन्यांत करून दाखविले आहे. कल्याणमध्ये बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी महारोजगार मेळावा घेतला असता महाविकास आघाडी सरकारकडून सरकारच्या विरोधात महामोर्चा काढून जनतेला वेठीस धरले जात आहे. हा विरोधाभास आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली.
कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात गुणगोपाळ मैदानात शनिवारी पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजक, नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. बालाजी किणीकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश कदम, राजेश माेरे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, या आधीचे सरकार वर्क फ्रॉम होम होते. आताचे सरकार प्रत्यक्षात जनतेत जाऊन काम करीत आहे. शिंदे- फडणवीस सरकारकडून पायाभूत सोयीसुविधा पुरविणारे प्रकल्प उभारण्याकरिता निधी दिला जात आहे, असे ते म्हणाले.
या मेळाव्यात विविध प्रकारच्या ७५ खासगी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. विविध प्रकारच्या जॉबसाठी ६ हजार तरुण -तरुणींनी नोंदणी केली. दुपारी ३ वाजेपर्यंत मान्यवरांच्या हस्ते सुमारे २ हजार ५०० तरुण तरुणांना ऑफर लेटरचे वाटप करण्यात आले.अंबरनाथपासून ठाण्यापर्यंत आठ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यांचे अपग्रेडेशन करण्याकरिता २५ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी मंत्री लोढा यांच्याकडे यावेळी केली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून १६० नवे उद्योजक निर्माण होणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी योजनेतून असंघटित कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचे ५ हजार लाभार्थी शोधण्यात आले असून, त्यांना ५ हजार रुपयांसह ७ हजार रुपयांचे किटही पुरविले जाणार आहे.