लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महानगर गॅस कंपनीच्या गॅसपुरवठा लाइनमध्ये गळती झाल्याने एमआयडीसीतील निवासी भागातील एम्स हॉस्पिटल रोडवरील काही सोसायट्या, बंगले आणि रुग्णालयात मंगळवार सायंकाळी ७ वाजल्यापासून १४ तास गॅसपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. यासंदर्भात तक्रारीसाठी रहिवाशांनी गॅस देयक आणि मीटरवर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर काहींना तो नंबर लागला असता त्यांना दुसरा नंबर देऊन तेथे तक्रार करण्यास सांगण्यात आले.
गॅसमीटरवर असलेला महानगर गॅसचा १८००२२९९४४ हा हेल्पलाइन नंबर बदलला असल्याने तो लागत नव्हता. तसेच नवीन नंबर महानगर गॅसने कळविलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही ठिकाणी मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास गॅसपुरवठा चालू झाला. तर काही ठिकाणी बुधवार सकाळी ९.३० च्या सुमारास गॅसपुरवठा चालू झाला. येथील एका खासगी रुग्णालयातही ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत गॅसपुरवठा बंद राहिला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचीही गैरसोय झाली.
यापूर्वीही अधूनमधून गॅसपुरवठा खंडित झाला आहे किंवा काही वेळेला ‘महानगर’कडून गॅसपुरवठा बंद राहणार असल्यास पूर्वनियोजित सूचना दिली जात असे. गॅसपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होऊ नये, म्हणून काहींनी विद्युत गॅस शेगडी खरेदी केली आहे. महानगर गॅस हा स्वस्तात व सुरक्षित असा चांगला पर्याय असल्याने अनेक नागरिक त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे ‘महानगर’ने आपली देखभाल, दुरुस्ती आणि हेल्पलाइन, कॉल सेंटर यांच्यात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत ग्राहक राजू नलावडे यांनी व्यक्त केले.
हॉटेलमधून जेवण मागविण्याची वेळ
महानगरचा पाइप गॅस आल्याने तेथील नागरिकांनी आपले पूर्वीचे गॅस सिलिंडर नियमानुसार कंपनीकडे परत केले आहेत. जरी हे सिलिंडर मिळाले तरी या गॅस शेगडीमध्ये ते वापरता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांना मंगळवारी रात्री बाहेरून हॉटेल अथवा पोळीभाजी केंद्रातून जेवण अथवा अन्नपदार्थ मागवावे लागले. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड पडला.
-------------