मीरारोड - मीरा भाईंदर शहरात होणारे महाराणा प्रताप यांचे भवन म्हणजे एक वीरभूमी दुसऱ्या वीरभूमीचा सन्मान कशी करते त्याचे हे सुंदर उदाहरण आहे . केवळ महाराष्ट्र व राजस्थान नाही तर संपूर्ण देशाला हा संदेश आहे कि , सर्वाना सोबत घेऊन आपण कसे चालले पाहिजे असे प्रतिपादन महाराणा प्रताप यांचे वंशज आणि उदयपूर चे राजपुत्र लक्ष्यराजसिंह यांनी केले .
मीरारोडच्या कनकीया भागात वीरशिरोमणी महाराणा प्रताप भवन चे भूमिपूजन शनिवारी रात्री लक्ष्यराजसिंह यांनी केले . यावेळी आमदार प्रताप सरनाईक , अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे , नगररचनेचे सहायक संचालक दिलीप घेवारे , शहर अभियंता दिपक खांबित , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , विक्रम प्रतापसिंह , सुरेंद्र भाटी आदी उपस्थित होते . भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
महाराणा प्रताप यांच्या आदर्शांवर व विचारांवर चालणे हे आपले कर्तव्य आणि धर्म आहे . मीरा भाईंदर शहरात प्रत्येक समाजाचे लोक राहतात . पण महाराणा प्रताप यांचे भवन व्हावे अशी गेल्या अनेक काळा पासूनची मागणी होती ज्याची आता सुरवात होत आहे असे सांगत लक्ष्यराज सिंह यांनी महाराष्ट्र सरकार व आ . सरनाईक यांचे आभार मानले .
अपना घर फेज १ मधील महापालिकेला मिळालेल्या सुविधा भूखंडात आधी हे भवन होणार होते . परंतु विकासकाने त्या भूखंडाला स्वतंत्र रस्ता दिला नसल्याने तसेच असलेला रस्ता हा गृहसंकुलाच्या आतून असल्याने तेथील रहिवाश्यांनी केलेला विरोध हा रास्तच होता. रहिवाश्यांच्या भूमिकेमुळे विकासका कडून रस्ता असलेला भूखंड घेण्याची मागणी आयुक्तांना केली आहे असे आ . सरनाईक म्हणाले .
महापालिका आयुक्त संजय काटकर आणि खास करून सह संचालक नगररचना दिलीप घेवारे व शहर अभियंता दीपक खांबित यांचे विशेष आभार मानत त्यांनी तात्काळ आरक्षण क्र . २७० मधील जागा उपलब्ध करून दिली . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि अजित पवार यांनी १ कोटींचा शासन निधी दिला असून आपण आणखी २ कोटींचा निधी देण्याची विनंती आपण केली आहे . कामास लगेच सुरवात होऊन एका वर्षात भवन चे काम पूर्ण होणार आहे असे आ . सरनाईक यांनी सांगितले .