ठाणे - जे स्वत: विनयभंगाची केस दाखल झाल्यावर कुठल्या मनस्थितीत गेले होते त्यामुळे फार त्यांनी बोलू नये. कब्रस्तानमधील मातीचं पाकिट कुणी खाल्लं, टॉरेन्सचं पाकिट महिन्याला कोण घेते या सगळ्या गोष्टी मुंब्रा कळवातील जनतेला माहिती आहे असा घणाघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला आहे.
पत्रकार परिषद घेत आनंद परांजपे म्हणाले की, ज्यांच्यावर विनयभंग, ३०७ गुन्हा आहे. ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची केस आहे. त्यांना नैतिक अधिकार नाहीत. जितेंद्र आव्हाडांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. विकासाची खोटी स्वप्ने लोकांना दाखवली. १५ वर्षानंतर लोक त्यांना प्रश्न विचारतेय. त्यातून विचलित होऊन ते आरोप करतायेत असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय इतिहासाचे खोटे दाखले द्यायचे. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय असं सांगायचे. कळवा ब्रीज ते वाय जंक्शन या पलीकडे एकही पाऊल आव्हाड टाकू शकत नाहीत. डॉ. जितेंद्र आव्हाड पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा अजित दादांनी दिलेल्या शब्दामुळे पतीला मंत्रिपद मिळाले असं आव्हाडांच्या पत्नी बोलल्या होत्या. जितेंद्र आव्हाडांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी असा इशारा परांजपे यांनी आव्हाडांना दिला.
दरम्यान, कळवा मुंब्रा इथं आल्यावर सातत्याने हिंदू मुस्लीम करायचे. कोट्यवधी भारतीयांची आस्था असलेले प्रभू श्रीराम मासांहरी होते असं विधान आव्हाडांनी केले. कायम हिंदू आणि सनातन धर्माचा अपमान करायचा. उत्तर भारतीयांचे शोषण करायचे त्याला कंटाळून उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. मतदारसंघातील जनता त्यांना विकासाचा जाब विचारतेय असंही आनंद परांजपे यांनी सांगितले. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्यात यावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर दिली.