- शाम धुमाळ
कसारा : शहापूर विधानसभा मतदार संघात पंचरंगी निवडणूक होणार, असे चित्र सुरवातीला दिसून येते होते. यात महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा तर जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा, मनसेचे हरिश्चन्द्र खंडवी आणि शिवसेना उबाठाचे बंडखोर उमेदवार अविनाश शिंगे यांचा समावेश होता.
या निवडणुकीमधून अविनाश शिंगे यांनी अचानक माघार घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले होते. तसेच, माघारीनंतर अविनाश शिंगे कोणाला पाठिंबा देणार, याबाबत उत्सुकता होती.दरम्यान,अविनाश शिंगे यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे व भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाळ यांना आपल्या बंडखोरीमुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करून शहापूर विधानसभेतील उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शहापूर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने मी बंडखोरी करीत निवडणूक लढवण्याचा निश्चय केला व त्यासाठी शहापूर शिवसेना सोबत होती. परंतु माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले.
अपक्ष उमेदवार अविनाश शिंगे यांनी आघाडी धर्म पाळत मोठ्या मनाने महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो.- सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (खासदार भिवंडी लोकसभा )