ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची अवघ्या दोन जागेवर बोळवण केल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा उगारला. जिल्ह्यातील १३ मतदारसंघांतील ३० बंडखोरांपैकी सर्वाधिक ९ बंडखोर उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे या नाराजांचे बंड शमविण्याचे महाविकास आघाडी समोर मोठे आव्हान आहे.
काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा हक्काचा भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला गेला. तेथून सुरेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले. काँग्रेसचे दयानंद चोरगे यांचे बंड शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ठाणे जिल्ह्यातील काही जागांवर काँग्रेसने दावा केला. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा माजिवडा आणि मुंब्रा कळवा मतदारसंघावर ठाणे काँग्रेसने दावा केला. यापैकी एक तरी जागा देण्याची मागणी केली.
काँग्रेसची गरज संपते तेव्हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष डावलतात असा आरोप ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. ठाण्यातील एनकेटी महाविद्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ठाणे लोकसभा प्रभारी जोसेफ यांच्या समोर ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यथा मांडली. अखेर ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यापाठोपाठ भिवंडी पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक चार, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि बेलापूर या मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत या बंडोबांचे बंड थंड करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी समोर आहे.
उद्धवसेनेचे ६, तर शिंदेसेनेचे ५ बंडखोर जिल्ह्यातील १३ विधानसभा मतदारसंघांत ३० बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली. यामध्ये उद्धवसेनेचे ६, शिंदेसेनेचे ५, भाजपचे ४, अजित पवार गट आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन तर, शरद पवार गटाच्या एकाने बंडखोरी केली.