मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात धार्मिक मुद्यावरच प्रामुख्याने प्रचार केला जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते व प्रचारासाठी येणारे नेते देखील धार्मिक मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत.
निवडणुकीत विद्यमान आमदार गीता जैन अपक्ष म्हणून तर माजी आमदार नरेंद्र मेहता भाजपाचे व मुझफ्फर हुसेन हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने रिंगणात आहेत. त्याचसोबत मनसेचे संदीप राणे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हंसूकुमार पांडे हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत.
निवडणुकीत शहरातील विकासकामे, समस्या, भ्रष्टाचार, राजकीय गुंडगिरी, घोटाळे आदींपेक्षा धार्मिक मुद्द्यावर प्रकर्षाने भर दिला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील निवडणूक मुख्यत्वे जैन आणि मेहता व त्यांच्या समर्थकांकडून धार्मिकतेवर लढवली जात असल्याचं दिसत आहे. अतिरेकी याकूब मेमन याची फाशी माफ करण्याचे मुझफ्फर यांची खोटी स्वाक्षरी असलेले बनावट पत्र भाजपाच्या मेहता समर्थकांनी समाज माध्यमांवर शेअर करून मुझफ्फर यांच्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रकार केला त्याबद्दल पोलिसांनी मेहता समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात आणखी आरोपी वाढणार आहेत.
तर भाईंदरच्या तारोडी - चौक येथील धार्मिक स्थळाच्या बेकायदा बांधकामचा वापर देशविघातक अतिरेकी कारवायासाठी केला जाऊ शकतो तसेच केशवसृष्टी येथे भाजपा, आरएसएस आदींचे मोठे नेते येत असल्याने त्यांना धोका होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अहवाल असताना त्या धार्मिक स्थळास मेहतांनी निधी व संरक्षण दिल्याचा मुद्दा आ. जैन समर्थक हे मेहतां विरुद्ध समाज माध्यमांवर उचलत आहेत.
विशिष्ट धर्माचे आम्हीच पाठीराखे आहोत असे आ. जैन व मेहतांकडून सातत्याने प्रचारात मांडले जात असून मुझफ्फर यांना धर्माच्या आधारे लक्ष केले जात आहे. परंतु मुझफ्फर यांनी देखील मंदिरांमध्ये दर्शना सह जैन व मेहता यांना धार्मिक ग्रंथ आणि धर्मावर जाहीर चर्चा करण्याचे आवाहन दिले. इतकेच काय तर त्यांनी देवी - देवतांच्या नावाचा जयघोष जाहीर सभांमध्ये करून जैन व मेहतांच्या धार्मिक प्रचारावर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. विशेष म्हणजे मीरा भाईंदर शहराचा मोठ्या लोकवस्तीचा भाग ज्या ओवळा माजिवडा मतदार संघात येतो तिकडे मात्र मीरा भाईंदर मतदार संघाप्रमाणे धार्मिक मुद्दा प्रचारात चर्चेत दिसत नाही हे विशेष.