ठाणे - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यात मुंब्रा कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाडांविरोधातअजित पवार गटाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. मुंब्रा येथील चंदनगर भागात जितेंद्र आव्हाडांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आव्हाडांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली. शरद पवारांना धक्का मारून पक्षाबाहेर काढले आणि त्यांचे चिन्ह चोरले अशी टीका आव्हाडांनी अजित पवारांवर केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार कधीही नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसमोर झुकले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी कसं काम केले हे मला माहिती आहे. शरद पवारांचा कॅन्सर पाचव्या स्टेजला होता तेव्हाही पक्ष वाढवण्यासाठी ते एका तरुणासारखं काम करत होते. अजित पवारांनी शरद पवारांना धक्कामारून पक्षाबाहेर काढले, त्यांचे चिन्ह चोरले. आम्हाला संविधान नको हे सांगणारे आरएसएस भाजपाचे होते. आरएसएसने कधी त्यांच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मुस्लीम समुदायाच्या धर्मगुरूबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यासोबत व्यासपीठावर बसतात. हा रामगिरी महाराज भोंदू आहे असं मी म्हणतो, तर एकनाथ शिंदे या रामगिरी महाराजाला तुम्हाला काही होणार नाही, तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही असं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही लढाईत मस्जिदीला हात लावला नाही परंतु महाराष्ट्रात कोल्हापूरात इरसाल वाडीला दंगल झाली, परंतु पोलिसांनी काहीच केले नाही आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दर महिना ३ हजार रुपये महिलांना देऊ, कुणीही महिलांवर बलात्कार करण्याचा प्रयत्नही करणार नाही. महिला सुरक्षा आम्ही देऊ. राज्यात महागाई किती वाढलीय..सरकारी अधिकारी आणि पोलिसांना पैसे देण्यास राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. ज्यादिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनेल त्यानंतर ७ दिवसांत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि केंद्र सरकार कोसळेल असा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला.