बदलापूर : महायुतीमध्ये निवडणूक निकालानंतर ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील मैदानावर शिंदेसेना व भाजपमध्ये शह-काटशहाचा खेळ सुरू झालाय. त्यात ठाणे शहर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर अशा वेगवेगळ्या मतदारसंघात भाजप व शिंदेसेनेतील इच्छुक नेते परस्परांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून दबावतंत्र वापरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे.
मुरबाडची बंडखोरी शहापूरमध्ये भोवणार?मुरबाड मतदारसंघात कथोरे यांच्या विरोधात म्हात्रे यांनी बंडखोरी केल्यास भाजप शहापूर आणि अंबरनाथ मतदारसंघात शिंदे सेनेसोबत ‘असहकार’ करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे मुरबाडमधील बंडखोरी ही शहापूर, अंबरनाथमध्ये शिंदेसेनेकरिता अडचणीची ठरू शकेल.ठाणे जिल्ह्यात एकूण १८ जागा असून येथे शिंदेसेनेचा वरचष्मा आहे. याच जागांच्या भरवशावर शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेला ‘चेक-मेट’ केले तरच भाजपला आपला मुख्यमंत्री बसवता येईल. लोकसभा निवडणुकीत तसा प्रयत्न भाजपने केला असला तरी भिवंडीची जागा भाजपने गमावली. तर ठाणे, कल्याणची जागा शिंदेसेनेनी जिंकली आहे.
वामन म्हात्रे बंडाच्या पवित्र्यातमुरबाड मतदारसंघात किसन कथोरे यांच्या विरोधात शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे बंडाच्या पवित्र्यात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिंदेसेनेचे महेश गायकवाड आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात शिंदेसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात भाजपचे नरेंद्र पवार बंडखोरीच्या वाटेवर आहेत. ठाणे जिल्ह्यात एका मतदारसंघात बंडखोरी झाली तर अन्य मतदारसंघात हिशेब चुकता करायला मित्रपक्ष तयार असल्याचे आता बोलले जात आहे.