उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी कुमार आयलानी व ओमी कलानी यांचे पक्षाच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने, दोघांचीही धाकधूक वाढली. दरम्यान आयलानी व कलानी यांच्या विरोधकांनी डोके वर काढण्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकापासून कलानी व आयलानी आलटून पालटून आमदार पदी निवडणूक आले. आयलानी हे भाजपातील प्रमुख इच्छुक उमेदवार असून ओमी कलानी हे शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत कुमार आयलानी यांचे नाव नसल्याने, त्यांची धाकधूक वाढली. स्वपक्षीय सहकारी नेते व मित्र पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्ष वरिष्ठ नेत्याकडे फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाची पहिली यादी गुरवारी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये ओमी कलानी यांचे नाव नसल्याने, कलानी हेही वेटिंगवर गेल्याचे बोलले जाते. पप्पु कलानी यांनी गुरवारी पक्ष प्रमुख शरद पवार यांची मुंब्रा येथे भेट घेतली. त्यानंतरही ओमी कलानी यांचे नाव यादीत नसल्याने, विविध चर्चेला उधाण आले. तर दुसरीकडे कलानी याना महाविकास आघाडीतील स्थानिक मित्र पक्षातील नेत्यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.
भाजपचे प्रमुख उमेदवार कुमार आयलानी यांचे पक्षाच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने, मित्र पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष सक्रिय होऊन उमेदवारी मागितली. तर शिंदेंसेनेकडून पक्षाचे स्थानिक नेते राजेंद्र चौधरी हेही उत्सुक असून पक्ष प्रमुख माझ्या नावाचा विचार करतील. अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली. पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. एकूणच पक्षाच्या पहिल्या यादीत आयलानी व कलानी यांचे नाव नसल्याने, त्यांच्यात धाकधूक वाढून स्वपक्षीय सहकारी व मित्र पक्षातील इच्छुकांनी डोके वर काढल्याचे चित्र शहरात आहे. दोघांनीही दुसऱ्या यादीत नाव येण्याचा विश्वास व्यक्त करून प्रचार मात्र सुरू ठेवला आहे.