अजित मांडके
ठाणे : ठाणे हे गद्दारीचे केंद्र बिंदू आहे. या केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल असे मत उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे बेनरवर फोटो लावता. मर्दाची खरी अवलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा आणि निवडणुका जिंकून दाखवा असे आव्हान देखील त्यांनी केले. काही पक्ष चिन्ह चोरून वारसदार झळव आहेत मात्र आनंद दिघे यांचे खरे वारसदार हा केदार दिघे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे. हा कलंक आता पुसण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे. हे आणि यांचे बगलबच्चे आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी पालिकेची तिजोरी रिकामी केली आहे. मुंबई महापालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवी यांच्या कंत्राटदारांनी लुटल्या, ठाण्याच्या जागेवर तुम्ही जरा जोर लावला असता तर ठाण्यातून गद्दार निवडून आला नसता असेही ते म्हणाले.
तुम्हाला ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. गेल्या वेळी बिनशर्ट पाठिंबा दिला होता यावेळी इनशर्ट पाठिंबा दिला आहे असा टोला त्यांनी मनसेवर लगावला. ती आता मनसे नाही तर गुनसे सेना असल्याची टीकाही त्यांनी केली.
तुमच्या मनात बाळासाहेब, दिघे असतील त्यांचे संस्कार तुम्हाला टिकवायचे असतील तर आता तुम्हाला हाती मशाल घेऊन पक्ष, चिन्ह चोरणाऱ्यांना आता धडा शिकवायचा आहे असेही ते म्हणाले. तसेच यावेळी सर्व मर्द निवडून द्यावे लागतील असेही उद्धव ठाकरे म्हणाले. स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला
सभा संपून राष्ट्रगीत झाल्यानंतर स्टेजवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी झाली. त्याच वेळी त्या स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला. त्यावेळी स्टेज उध्दव ठाकरे उपस्थित होते. सुदैवाने उध्दव ठाकरे यांच्यासह इतर कोणालाही दुखापत झाली. या घटनेने खळबळ उडाली. तर काही मिनिटात उध्दव ठाकरे स्टेज वरून खाली उतरले.