मविआतील पक्षांचा प्रचार करायचा की नाही?, काँग्रेसचे पदाधिकारी करणार आज फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 09:19 AM2024-10-27T09:19:11+5:302024-10-27T09:19:40+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला नाममात्र जागा आल्या असून, ठाण्यातील चारपैकी एकही जागा आली नसल्याने निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करायचा की नाही याचा फैसला आज, रविवारी ठाणे शहर काँग्रेस घेणार आहे. पक्षाच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात ठाणे लोकसभेचे निरीक्षक संवाद साधणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
काँग्रेसच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता एन.के.टी. हॉल येथे एक दिवसाचा निर्धार मेळावा आणि बी.एल.ए. प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात ७०० कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. या शिबिराला ठाणे लोकसभेचे निरीक्षक तथा केरळचे आमदार सजीव जोसेफ हे मार्गदर्शन करणार आहेत.
नाराजी दूर करणार की...?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मेळावा घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच वरिष्ठ नेते संवाद साधणार असल्याची माहिती शहर काँग्रेसमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. चार विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला संधी न दिल्याने असलेली नाराजी यावेळी व्यक्त होईल, असे समजते.