अजित मांडके लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील चार मतदारसंघांत यावेळी कांटे की टक्कर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून उद्धवसेनेचे केदार दिघे रिंगणात उतरणार आहेत. ठाणे शहरात भाजप, मनसे आणि उद्धवसेना यांच्यात रंगतदार लढत अटळ आहे. ओवळा माजिवडात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशी थेट लढत पहावयास मिळेल.
ठाणे शहरात तिरंगी लढत
ठाणे शहरमधून भाजपने तिसऱ्यांदा संजय केळकर यांना संधी दिली आहे. मनसेचे अविनाश जाधव हे दुसऱ्यांदा त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. उद्धव सेनेकडून माजी खा. राजन विचारे मैदानात आहेत. शिंदेसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
मुंब्रा-कळवा : मित्र झाला विरोधी
मुंब्रा-कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. गेल्या निवडणुकीत आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला होता. यावेळी आव्हाड विरुद्ध त्यांचे निकटवर्तीय यांच्यात लढत आहे. मनसेने सुशांत सुर्वेराव यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे सेनेतील नाराज राजन किणे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.
कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. मागील वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. परंतु, शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. आता शिंदे यांच्या समोर उद्धव सेनेकडून 'दिघे कार्ड' चालवले जात आहे. येथून स्व. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव सेनेने मैदानात उतरवले आहे.
या मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना असा सामना रंगणार आहे. प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेकडून नरेश मणेरा यांचे नाव अंतिम झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप पाचंगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.