लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या अधिकृत प्रचाराची अंतिम मुदत सोमवार १८ नोव्हेम्बरच्या सायंकाळी ५ वाजे पर्यंत असल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील अधिकृत प्रचार संपला आहे . प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावत शक्ती प्रदर्शन केले . शहरात आज वाहनांच्या विविध रॅली मुळे रस्ते घोषणांनी गजबजून गेले होते .
सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रामुख्याने अपक्ष उमेदवार आमदार गीता जैन , काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार मुझफ्फर हुसेन व भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता सह अन्य उमेदवारांनी वाहनांची रॅली काढली होती . त्यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे रॅली मुळे रस्ते विविध रंगी झेंडे व कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते .
लोकांशी जास्तीजास्त संपर्क साधण्यासह प्रचारात राहिलेला परिसर उरकून घेण्यावर देखील काहींनी भर दिला . आ . जैन , मुझफ्फर व मेहता यांच्यात मुख्यत्वे त्रिकोणी लढत असली तरी मनसेचे संदीप राणे , माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम व भाजपाचे बंडखोर हंसुकुमार पांडेय हे मतांची कशी जुळवाजुळव करतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
शहरातील आपण सुरु केलेली विकासकामे ठप्प पडल्याचा आरोप मेहतांनी आ . जैन यांच्यावर तर निवडणूक आल्यावर बाहेर पडणारा नेता अशी टीका मुझफ्फर यांच्यावर केली .
शहरात २०१९ पूर्वी होणारी लूटमार , भ्रष्टाचार , गुंडगिरी रोखण्याचे काम केले. दोन ठिकाणी मेट्रोचे व सूर्या पाणी योजनेची कामे मेहतांनीच बंद पाडली . मेट्रो व त्याखाली उड्डाणपूल , पाणी योजना , सिमेंट काँक्रीट रस्ते , कोरोना काळात वैद्यकीय सुविधा व उपचार आदी अनेक कामे झाल्याचे आ . जैन म्हणाल्या .
१० वर्षात शहराचे वाटोळे केले असून केवळ भ्रष्टाचार, जमिनी आणि जुन्या इमारतींवर डोळा ठेऊन मेहता व जैन यांनी केवळ स्वतःचा विकास केला अशी टीका मुझफ्फर हुसेन यांनी केली .
अनेक राज्याचे मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री प्रचारासाठी आले . सभा व प्रचार मुख्यत्वे धार्मिक मुद्द्यांवरच एकमेकांवर आरोप - टीका करण्यात रंगला .