Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आता काळजीवाहू मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेक बाबींवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काय बोलणे झाले, याबाबत माहिती देताना मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाष्य केले.
निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चालले. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. गेल्या अडीच वर्षांत भाजपा आणि केंद्र सरकारने खूप पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या काळात बंद झालेल्या अनेक योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ यांसह अनेक योजना राबवल्या. यशस्वी केल्या. सगळ्या पदांपेक्षा सख्खा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नाराज होऊन आम्ही रडणारे नाही, जनतेसाठी काम करणारे आहोत
मी कार्यकर्ता म्हणून काम केले. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन. महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाइड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केले, लोकांनी जो विश्वास दाखवला. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!
बाळासाहेब ठाकरे यांची सर्वसामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला मान्य असेल. काल पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना फोन केला होता. त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय होईल, त्यामध्ये माझा कोणताही अडसर नसेल. भाजपाचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपासोबत उद्या बैठक आहे, तिथे महायुतीचे सरकार स्थापन करण्याबाबत साधक-बाधक चर्चा होईल. यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. गेली अडीच वर्ष भाजपाने पाठिंबा दिला. त्यामुळे आता आम्ही भाजपा जो निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल. पराभूत झाल्यानंतर विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे. लोकसभेवेळी ईव्हीएम ओके होते, झारखंडला ईव्हीएम ओके होते, अशी विचारणा करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.