ठाणे – ठाण्यातील महाराष्ट्र बंदला(Maharashtra Bandh) प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयत्न केला. ठाण्याचे शिवसेनेचे उपमहापौर यांचे पती मारहाणीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना(Shivsena) राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर बाजारपेठेत एकत्र फिरून दुकाने बंद केली. एकीकडे टीएमटी सेवा बंद असताना रिक्षाचालक प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवत होते.
मात्र रिक्षाचालक बंद करत नसल्याचं पाहत स्टेशन परिसरात शिवसेनेचे उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे आपल्या कार्यकर्त्यांसह स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांना दांडक्याने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचे पुन्हा दादागिरी वाढली का अशी चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्र बंदचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवडा, कोलशेत, पाचपखाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षावर अवलंबून राहावे लागले मात्र याच संधीचा फायदा रिक्षावाले घेत आहेत आणि रोजच्या पेक्षा तीस ते पन्नास रुपये अधिक दर प्रवाशांकडून वसूल करत आहेत, तसेच रिक्षा देखील जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये भांडणे होताना दिसून येत आहेत. लघू उद्योजकांनी या बंद मधून माघार घेतली आहे आता कुठे आमचे उद्योग सुरू झालेले असताना, अशा प्रकारे बंद करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे ठाणे शहर भाजपाने देखील या बंदचा कडाडून निषेध केला आहे.
बंदसाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर
महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असल्याने ठाण्यात या बंदच्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले. महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले . यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले . दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.