ठाणे : लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे ठाण्यात सर्वसामान्य ठाणेकरांचे मात्र चांगलेच हाल झाले. सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेवर अवलंबून राहावे लागते. परिवहन सेवा पूर्णपणे बंद असल्याने रिक्षाचालकांकडून मात्र ज्यादा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याचे प्रकार सुरु आहे. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात परिवहनची एकही बस उपलब्ध नसल्याने या परिसरात प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.
आजच्या महाराष्ट्र बंदला ठाण्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या बंदचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तक नगर, माजिवडा, कोलशेत, पाचपखाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याने रिक्षावर अवलंबून राहावे लागत आहे, मात्र याच संधीचा फायदा रिक्षावाले घेत आहेत आणि रोजच्या पेक्षा तीस ते पन्नास रुपये अधिक दर प्रवाशांकडून वसूल करत आहेत, तसेच रिक्षा देखील जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये भांडणे होताना दिसून येत आहेत. लघू उद्योजकांनी या बंद मधून माघार घेतली आहे आता कुठे आमचे उद्योग सुरू झालेले असताना, अशा प्रकारे बंद करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे ठाणे शहर भाजपने देखील या बंदचा कडाडून निषेध केला आहे. त्यातही तुरळक प्रमाणात रिक्षा वगळल्यास शहरातील रिक्षा सेवा ही 90 टक्के बंद असल्याचे दिसून येत आहे.
रिक्षा जबरदस्तीने बंद करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ठाण्यातील बंदला प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना मारहाण करून बंद करण्याचा प्रयन्त केला. ठाण्याचे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी देखील या मारहाणीत सहभागी असल्याचे पाहायला मिळाले. केवळ रिक्षाच सुरु असल्याने बंद पूर्णपणे यशस्वी कारण्यासाठी शिवसैनिकही यावेळी आक्रमक झाले. जांभळी नाका परिसरात रिक्षाचालकांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे.
व्यापाऱ्यांनीही दुकाने केली बंद आताच आमची दुकाने कुठे उघडली आहेत. त्यामुळे या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. ठाण्यात मात्र बाजारपेठ आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या वतीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. बंदच्या आदल्या दिवशीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करत होते. त्याला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे.
बंदसाठी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असल्याने ठाण्यात या बंदच्या समर्थनार्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र रस्त्यावर उतरले. महापौर नरेश म्हस्के तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकतें रस्त्यावर उतरले . यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले . दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यात महत्वाच्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
'महाराष्ट्र बंद' चे लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा