- सचिन सागरेकल्याण : कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि उल्हासनगर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी सीएपीएफ, एसआरपीएफच्या जवानांसह अधिकारी आणि स्थानिक पोलीस असे ७० शस्त्रधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. सोमवारी रात्रीपासून गुरुवारी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. तसेच, मतमोजणीनंतर त्वरित विजयी उमेदवारास मिरवणूक काढण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
पाच विधानसभा मतदारसंघांतील मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन उल्हासनगर येथील व्हीटीसी, कल्याण ग्रामीण मतदारसंघातील ईव्हीएम मशीन सावळाराम क्रीडासंकुल, डोंबिवली मतदारसंघातील ईव्हीएम मशीन सावित्रीबाई फुले नाट्यगृह तर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन प्रांत कार्यालय येथे ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी गुरुवारी मतमोजणी होणार आहे. या परिसरात सीएपीएफ आणि एसआरपीएफ अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत.
पाच मतदारसंघामध्ये सुमारे ४०० शस्त्रधारी कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र तैनात आहेत. तसेच परिसरावर नजर ठेवण्यासाठी मचाण उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरात एक पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी हे दोघे मोटारसायकलवर आसपास सतत फिरत राहणार आहेत. याठिकाणी सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी दर दोन तासांनी भेट देणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी साध्या वेशात टेहळणी करण्यात येणार असून १०० मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. यावेळी घातपात विरोधी पथकही परिसरात तपासणी करणार आहे. दरम्यान, निवडणूक विभागातर्फे पासधारकांना मतमोजणी केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीत बदल
डोंबिवली पूर्वेतील बंदिस्त सभागृह आणि सावळाराम क्रीडा संकुलात कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या वेळी वाहतूक बदल करण्यात आला आहे. बंदीश पॅलेस हॉटेल ते घरडा सर्कलकडे येणाºया रोडवर व घरडा सर्कल ते बंदीश पॅलेसकडे जाणाºया रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस आणि घरडा सर्कल येथे प्रवेश बंद असेल.
डोंबिवलीकडून घरडा सर्कलमार्गे बंदीश पॅलेसकडे जाणारी वाहने सरळ घारडा सर्कल येथून सुयोग हॉटेल येथून इच्छित स्थळी जातील. तसेच, खंबाळपाडामार्गे इच्छित स्थळी जातील. बंदीश पॅलेसकडून गॅस गोदामाकडे जाणारी तसेच तेथून ‘बंदीश’कडे येणाºया सर्व वाहनांना गॅस गोदाम आणि ‘बंदीश’ येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने ‘बंदीश’ हॉटेलकडून गॅस गोदामाकडून पुढे विको नाक्याकडे जाणारी वाहने खंबाळपाडामार्गे पुढे जातील.